मौदा समाचार : मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी शेतशिवारामधून दिनांक १६ जुलै २०२५ रोजी रात्री अज्ञात आरोपींनी वेगवेगळ्या शेतांमधून शेतीसाठी उपयोगात येणारे पाण्याचे मोटार पंप चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत मौदा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत मोठी कामगिरी बजावत चार आरोपींना अटक केली असून एकूण १.५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी मौदा पोलिसांनी तात्काळ गुन्हे शोध पथक सक्रिय करून गुप्त बातमीदारांची मदत आणि तांत्रिक साधनांचा वापर करत कारवाई केली. १ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी खालील चार आरोपींना अटक केली – गुलशन मुरलीधर मरसकोल्हे (वय २१), राजतिलक मुरलीधर मरसकोल्हे (वय १९), सुमेध विनायक गणवीर (वय २३) – हे तिघेही रा. खेडेपार, ता. लाखणी, जि. भंडारा, ह.मु. वडोदा (ता. कामठी), तसेच चोरीची मालमत्ता खरेदी करणारा भंगार व्यवसायिक अखिलेश लक्ष्मीप्रसाद शाहु (वय २७), रा. यशोधरानगर, नागपूर, ह.मु. वडोदा. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ८ मोटार पंप (किंमत अंदाजे ₹४०,०००/-), तसेच चोरीच्या वेळी वापरलेली दोन मोटारसायकली – हिरो स्प्लेन्डर प्लस (MH 40 CU 8732) आणि हिरो पॅशन प्रो (MH 34 AG 2937) असा एकूण सुमारे ₹१,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय गुन्ह्यातील आणखी एक आरोपी आयुष चौधरी (रा. वडोदा) सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मौदा पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षम तपासपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.