- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : फुटाळा तलावात अग्निशमन दलाच्या जवानांचे मॉक ड्रिल

■ पावसाळ्यातील संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी केला सराव

नागपूर समाचार : पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालिन परिस्थितीमध्ये नागरिकांना बचावकार्य व मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आज (शुक्रवारी) आपत्ती व्यवस्थापनातील इतर संस्थांच्या सहकार्याने फुटाळा तलावात सराव केला. यात पुरात अडकलेल्या व्यक्तींना जीवन रक्षा प्रणालीच्या माध्यमातून वाचविणे तसेच नागरिकांना मदत कार्य पोहोचविण्याचे प्रात्यक्षिके करण्यात आली.

पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात सराव करण्यात आला् तसेच आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी व इतर संस्थांच्या जवानांनी संकटकाळात बचाव कार्याचे प्रात्यक्षिके केले.

शहरातील सर्व अग्निशमन केंद्रातील निवडक जवान या मॉक ड्रिल मध्ये सामील झाले होते. यावेळी अग्निशमन केंद्रातील बोटी तसेच आऊट बोर्ड मशीनच्या (ओबीएम) सहकार्याने हा सराव करण्यात आला. यासंदर्भात मान्सून पूर्व आढावा बैठकीत निर्देश दिले होते.

अग्निशमन दलाच्या या सरावामध्ये शहरातील इतर आपत्ती व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले होते. यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर पोलीस दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), आरोग्य विभाग, होमगार्डचे जवान तसेच आपदा मित्रही सहभागी झाले होते. या सर्व जवानांनी पावसाळा किंवा पूरसदृश स्थितीमध्ये नागरिकांचे बचाव करणे तसेच आपत्कालिन स्थितीमध्ये नागरिकांना मदत कार्य पोहोचविण्याचा सराव करण्यात आला. जीवन रक्षा प्रणालीचा वापर करण्याच्या संदर्भात माहिती यावेळी जवानांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *