सीएसआर उपक्रम समन्वयासाठी महिन्यातून दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
नागपूर समाचार : सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून शासनासमवेत औद्योगिक जगतातील विविध उद्योगांनी सीएसआर अंतर्गत दिलेले योगदान मोलाचे आहे. ज्या भागात आपली कंपनी कार्यरत आहे त्या भागातील पर्यावरणासाठी, भूमीपुत्रांसाठी त्यांच्या गरजेनुरुप आवश्यक ते उपक्रम नियोजनबध्द पध्दतीने हाती घेतल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम साध्य करता येईल. यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून सीएसआर अंतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्यातून दोन वेळा आढावा घेऊ, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
सीएसआर अर्थात (कारर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत विविध उपक्रम हाती घेणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी डॉ. पुजा पाटील, वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडचे शेखर रायप्रोलो, गेल इंडियाचे निखील खरवंडीकर, मॉईल इंडियाचे रायपूरे, एनटीपीसीचे जी. शिवाकांत व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध सेवाभावी उपक्रमांसहित सीएसआर अंतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा प्राधान्यक्रम हा लोकांच्या आत्यंतिक गरजेनुरुप असला पाहिजे. ज्या भागात आपली कंपनी आहे त्या भागातील पर्यावरणासह स्थानिक लोकांच्या सुविधेसाठी कंपन्यांनी अगोदर विचार करावयास हवा. याच बरोबर दुसरा प्राधान्यक्रम आरोग्य सेवा सुविधेच्या दृष्टीने असला पाहिजे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी त्या-त्या भागातील कंपन्यांनी भर दिला पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ इटनकर म्हणाले. यासाठी जिल्हा प्रशासन शासनाच्या नियम व ध्येयधोरणाप्रमाणे प्रयत्नरत राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही उपक्रमाचे नियोजन सर्व सहमतीतून व्हावे यादृष्टीने भर दिला पाहिजे. नागपूर जिल्ह्यातील सीएसआर अंतर्गत उपक्रम हाती घेणाऱ्या विविध कंपन्या, शासकीय-निमशासकीय संस्थांनी जिल्हा प्रशासनासमवेत समन्वय साधून उपक्रम हाती घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
उपक्रमांचे सुनियोजन व समन्वयासाठी याच बरोबर भविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्यातून किमान दोन बैठका घेऊन वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



