ख्रिसमसच्या पर्वावर 15 वा विश्व विक्रम, नितीन गडकरींनी दिला शुभेच्छा
नागपूर समाचार : पदार्थांसोबतच नवनवीन रेकॉर्ड करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवार 25 डिसेंबर रोजी आणखी एक नवा विक्रम केला आहे. ख्रिसमसला मनोहर यांनी स्थानिक बी. आर. ए. मुंडले हायस्कूलच्या सुमारे 1200 मुलांसोबत 5 हजार किलोंची भाजी तयार केली आहे. रविवारी सकाळी 9 वाजेपासून प्रत्यक्ष भाजी तयार करण्याला सुरूवात झाली. ही भाजी खवय्यांना वितरीत करण्यात आली. त्यापूर्वी भाजी निवडणे, चिरणे आणि स्वच्छ करणे ही कामे मुलांनी केली. तर भल्या मोठ्या कढईत फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी केले. भाजीचा मनोहर यांचा 15 वा विश्व विक्रम होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या भाजीसाठी कांदे 330 किलो, लसुण, आलं व बटाटे प्रत्येकी 66.1 किलो, गाजर 330 किलो, फुलकोबी 661 किलो, पनीर 330.5 किलो, टोमॅटो 661 किलो, मटार 330.5 किलो, सांभार 132.2 किलो, तिखट 52.88 किलो, हळद 33.05 किलो, धने पावडर 39.66 किलो, मीठ 33.05 किलो, साखर 13.22 किलाे, तेल 396.6 किलो असे एकूण 4137.86 जिन्नस लागले आहे. तयार भाजीचे वजन 4997.16 किलो इतके होते.
यापूर्वी विष्णू मनोहर यांनी रविवार 16 ऑक्टोबर रोजी म्हणजेच जागतिक खाद्यान्न दिनी दोन हजार किलो महाचिवडा तयार केला होता. रामदासपेठ येथील विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी 9 ते 11 या वेळेत तयार करण्यात आलेल्या चिवड्याचे कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले होते.
गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच 2500 किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण केले होते. सलग 53 तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. 5 फूट लांब आणि 5 फूट रुंद असा “सर्वात लांब पराठा’ तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात 7000 किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी भारतात 3200 किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.