- नागपुर समाचार

महानिर्मिती मिशन ऑक्सीजन अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय कामठी मध्ये ऑक्सीजन प्लांट सुरू   नागपूर ग्रामीण मधील पहिला ऑक्सिजन प्लांट ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण-

नागपूर, ता. 31 मे – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मिती मिशन ऑक्सीजन दुसऱ्या टप्प्यातील 35 घनमीटर प्रती तास क्षमतेच्या ऑक्सीजन प्लांटचे आज कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयात लोकार्पण झाले. अत्यंत कमी कालावधीमध्ये हा प्लांट कार्यान्वित  केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीच्या खापरखेडा वीज केंद्र आणि मुंबई येथील संबंधित समस्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन (पी.एस.ए.) तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा ऑक्सीजन प्लांट नागपूर ग्रामीण भागातील पहिलाच प्लांट आहे. महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी खापरखेडा वीज केंद्राच्या टिमच्या माध्यमातून हा ऑक्सिजन प्लांट अवघ्या 18 दिवसात कार्यान्वित केला, हे विशेष. हा प्लांट कमी कालावधीत कार्यान्वित करण्यासाठी मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता शरद भगत, प्रभारी उपमुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये, हेमंत टेंभरे, मे. ओरायपल, मेसर्स अबु कन्स्ट्रक्शन यांचे अथक परिश्रम असून महावितरण आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले. या प्लांटमधून  दररोज 65 ते 70 रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा होणार आहे आणि 95 टक्के एवढ्या शुद्धतेचा प्राणवायू उपलब्ध होणार आहे. जपान येथून कॉम्प्रेसर आणण्यात आला आहे. कोविडची दुसरी लाट आणि आगामी तिसऱ्या लाटेची गरज लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यभर रुग्णांना ऑक्सीजनची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मितीचे मिशन ऑक्सीजन धोरण निश्चित करण्यात आले आणि ऊर्जामंत्री यांचे निर्देशानुसार महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे नेतृत्वाखाली सांघिक सामाजिक बांधिलकीतून महानिर्मितीने तीन टप्प्यांमध्ये महत्वाकांक्षी मिशन ऑक्सीजनचा आराखडा तयार केला.
 
प्रथम टप्प्यात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबेजोगाई येथे प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा  व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट २७ एप्रिल रोजी कार्यान्वित झाला तर दुसऱ्या टप्प्यातील खापरखेडा वीज केंद्रामार्फत उप जिल्हा रुग्णालय कामठी येथे आज लोकार्पण झाले तर परळी विज केंद्रामार्फत जिल्हा रुग्णालय परभणी येथे,  पारस विज केंद्रातर्फे मेडिकल कॉलेज अकोला येथे ऑक्सीजन प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.  तिसऱ्या टप्प्यात कोराडी(नागपूर), पारस(अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *