- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डागा स्त्री रुग्णालय परिसर असुरक्षित; पोलीस चौकी तात्काळ सुरू करा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मागणी

तहसील पोलिसांना निवेदन, मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांकडेही पाठपुरावा

नागपूर समाचार : भारतातील क्रमांक २ चे शासकीय डागा स्त्री रुग्णालय सध्या असुरक्षित बनले आहे. रुग्णालयासमोर महामेट्रोचे काम सुरू असल्याने मुख्य प्रवेशद्वार व परिसर अस्ताव्यस्त झाला आहे. प्रवेशद्वार बंद असल्याने बाहेरील समाजकंटक रुग्णालय परिसरात घुसून दारू व अमली पदार्थांचे सेवन करतात. सुरक्षा रक्षकांना दमदाटी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

महिला व नवजात अर्भकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालय आवारात स्वतंत्र पोलीस चौकी तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसील पोलीस ठाण्यात निवेदन दिले. जोपर्यंत पोलीस चौकी सुरू होत नाही, तोपर्यंत २४ तास पोलीस पेट्रोलिंग सुरू ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली.

डागा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप मडावी यांनी पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सहकार्य दर्शवले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे निवेदनात नमूद आहे. 

या प्रकरणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर पोलीस आयुक्त तसेच तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. तहसील पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी अधिकारी पी.एस.आय. सूरज नारायणराव शिरसाट यांनी निवेदन स्वीकारले. 

यावेळी उपस्थित मान्यवर 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा, नागपूर शहर संपर्क प्रमुख रमेश डोके, शहर प्रमुख विवेक दस्तुरे, शहर प्रमुख जगदीश गुप्ता, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली फुलझेले, महिला आघाडी शहर प्रमुख महिमा शर्मा, दक्षिण-पश्चिम विधानसभा संघटक संजय गवई, दक्षिण नागपूर उपविभाग प्रमुख राजेश पाटील यांच्यासह कक्षाचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.