- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कृष्णभक्ती व नाटकाचा सुरेख संयोग असणारी भावकथा – डॉ अविनाश मोहरील

प्रफुल्‍ल माटेगांवकर यांच्‍या ‘कृष्‍णार्पण’चे प्रकाशन

नागपूर समाचार : प्रफुल्‍ल माटेगांवकर यांच्‍या ‘कृष्‍णार्पण… एक भाव कथा’ या दीर्घ कथासंग्रहामध्ये कृष्णभक्ती सोबत नाटकाचा सुरेख संयोग झालेला बघायला मिळतो. यातली भाषा भारदस्त असली तरी मनाला भिडणारी आहे असे मत मह‍िला महाव‍िद्यालय, अमरावतीचे मुख्‍याध्‍यापक डॉ अविनाश मोहरील यांनी व्यक्त केले.

साह‍ित्‍य प्रसार केंद्राच्‍यावतीने नाट्यकर्मी प्रफुल्‍ल माटेगांवकर यांच्‍या ‘कृष्‍णार्पण… एक भाव कथा’ या पहिल्‍या दीर्घ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी विदर्भ साह‍ित्‍य संघाचे अमेय दालनात पार पडला.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ साह‍ित्‍य संघाचे अध्‍यक्ष प्रदीप दाते होते तर कार्याध्‍यक्ष व प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, प्रसिद्ध पत्रकार व लेखक शैलेश पांडे यांच्यासह मंचावर डॉ अविनाश मोहरील, प्रस‍िद्ध कवय‍ित्री ज्‍योत्‍स्‍ना पंडीत, साहित्य प्रसार केंद्राच्या मुक्ता कुळकर्णी, प्रफुल्‍ल माटेगांवकर व त्यांच्या मातोश्री आशा माटेगावकर यांची उपस्थिती होती. 

डॉ अविनाश मोहरील पुस्तकावर भाष्य करताना म्हणाले, अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाणारा या पुस्तकाचा प्रवास आहे. यात कलाकाराचे जिवंत असणे आणि त्याच्या कलाप्रवासाचा आरंभ बिंदू दिसतो. हे पुस्तक व. पु काळेची आठवण करून देते. 

शैलेश पांडे यांनी साहित्य क्षेत्रातील दमदार आगमनासाठी प्रफुल्‍ल माटेगांवकर यांचे अभिनंदन केले. या दीर्घकथेत मोठ्या कादंबरीची बीजे दिसत असल्याचे ते म्हणाले.

ज्‍योत्‍स्‍ना पंडीत यांनी आयुष्य प्रवाही असते, हा संदेश हे पुस्तक देते असे सांगितले.

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ही एकरेशीय लघू कादंबरी असून तिची रचना विलोभनीय आहे. एक कथा आणि कादंबरी कशी असावी, त्यात काय काय अपेक्षित असते यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रदीप दाते अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले, प्रफुल्‍ल माटेगांवकर यांच्या लिखाणाची ओघवती शैली असून चांगली मांडणी केली गेली आहे. भविष्यात त्यांच्याकडून उत्तम लिखाणाची अपेक्षा वाढली आहे.

प्रास्ताविक करताना प्रफुल्‍ल माटेगांवकर यांनी कथासंग्रह घडण्यामागचा प्रवास उलगडला.   

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली दुरुगकर यांनी केले तर आभार विनय मोडक यांनी मानले. निधी रानडे यांनी पसायदान सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *