- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘कलादर्शन’ कार्यक्रमांच्या मालिकेत शास्त्रीय कलेचे प्रस्तुतीकरण होणार

२८ जानेवारी २०२३ रोजी निरुपमा राजेंद्र, टी डी राजेंद्र यांचे कथ्थक सादरीकरण

नागपूर समाचार : भारतीय विद्या भवन नागपूर केंद्राद्वारे संचालित ‘कलासर्जन अकादमी ऑफ क्लासिकल म्युजिक, डान्स अँड फाईन आर्टस्’ तर्फे देशातील अभिजात कला जोपासणारे आणि कलेच्या क्षेत्रात कार्यरत कलाकारांची ओळख आणि त्यांचे सादरीकरण मालिकेच्या रूपात प्रदर्शित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. देशभरातील शास्त्रीय कला प्रदर्शित करण्यासाठी ‘कलादर्शन’ या उपक्रमशील व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

‘कलादर्शन’ बाबत अधिक माहिती देताना, कलासर्जन अकादमी ऑफ क्लासिकल म्युजिक, डान्स अँड फाईन आर्टस् च्या प्राचार्य, श्रीमथी एस माडखोलकर यांनी सांगितले, अभिनव नृत्य कंपनी, बेंगळुरूच्या आर्टिस्टिक डान्स संचालक श्रीमती. निरुपमा राजेंद्र आणि श्री. टीडी राजेंद्र 28 जानेवारी 2023 रोजी भगवानदास पुरोहित सभागृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे संध्याकाळी 6 वाजता ‘कलादर्शन’ मध्ये कथ्थक सादर करणार आहेत.

निरुपमा राजेंद्र भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्य प्रकारातील एक उल्लेखनीय भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्या कर्नाटकातील बंगलोर येथील रहिवाशी आहेत. निरुपमा आणि त्यांचे पती राजेंद्र एकत्र कथ्थक नृत्याचे सादरीकरण करतात. नृत्य अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने त्यांनी 1994 मध्ये अभिनव डान्स कंपनीची स्थापना केली. ते पारंपारिक आणि समकालीन नृत्य शैली एकत्र करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या जोडीने अनेक परफॉर्मन्स दिले आहेत आणि नाट्य मयुरी आणि नाट्य मयुरा (1998), कर्नाटक कलाश्री (2011) आणि नृत्य चूडामणी यासह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

दरम्यान असे कार्यक्रम दर दोन महिन्यांनी आयोजित केले जातील. या कार्यक्रमांतुन प्रतिभावान आणि व्यावसायिक ‘ए’ श्रेणीतील कलाकारांना शास्त्रीय कला प्रकारांबद्दल बोलण्याची, सादरीकरणाची आणि त्यांचा प्रसार करण्याची संधी मिळेल. शास्त्रीय कलेचे संवर्धन आणि प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यापूर्वी ‘कलादर्शन’चे दोन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले असून त्यात मुंबईतील भरतनाट्यम कलाकार पवित्रा भट आणि नागपूरच्या शास्त्रीय कलाकार साधना शिलेदार यांनी सादरीकरण केले आहे. या कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असेल.

भारतीय विद्या भवन, नागपूर केंद्राच्या कार्यकारिणी सदस्य पद्मिनी जोग, अध्यक्ष राजेंद्र पुरोहित, संचालक अन्नपूर्णी शास्त्री, श्रीमथी एस माडखोलकर आणि संयोजक समितीने शास्त्रीय कलाप्रेमी आणि इच्छुक, विदयार्थी, गुरु आणि सर्व इच्छुक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

कलासर्जन बद्दल : भारतीय विद्या भवन नागपूर केंद्राद्वारे संचालित ‘कलासर्जन अकादमी ऑफ क्लासिकल म्युजिक, डान्स अँड फाईन आर्टस्’ हे भारतीय शास्त्रीय कलेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ आहे. गेल्या १५ वर्षांपासून इच्छूकांना शास्त्रीय शास्त्रीय कलेचे प्रशिक्षण देऊन शास्त्रीय कलेच्या क्षेत्रात योगदान देत आहे. अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे, कलासर्जन ही मध्य भारतातील एक नावाजलेली अकादमी आहे ज्यामध्ये व्यावसायिक शास्त्रीय कला शिक्षक असून आणि प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *