- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गौंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

नागपूर समाचार : सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र, ज्या वेळी संधी उपलब्ध होतात, त्याच वेळी नवीन आव्हानेही समोर उभी राहतात. लॉजिस्टीक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचे असेल, तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गोंडखैरी येथे उभारण्यात आलेल्या गोदाम लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार डॉ. आशिष देशमुख, परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, कृष्णकुमार गुप्ता, हल्दीरामचे शिवकिसन अग्रवाल आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर व गडचिरोली भागातही आता उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे लॉजिस्टीक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टीक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.