अतिपूरप्रवण खेडी गावास भेट देत यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना
नागपूर समाचार : मा. जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर श्री. विनायक महामुनी यांनी आज कामठी तालुक्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध विभागांच्या तयारीचा सखोल आढावा घेतला.
यावेळी त्यांनी सर्वप्रथम तालुक्यातील अतिपूरप्रवण खेडी गावास भेट देऊन तेथील आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील पूरप्रवण क्षेत्र, उपलब्ध बचाव व मदत साहित्य, आपत्कालीन यंत्रणा, निवारा केंद्रांची तयारी तसेच संभाव्य पूरस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहून तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना देत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी कामठी तहसील कार्यालयास भेट देऊन विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे प्राधिकरण, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL), कृषी विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पूरस्थितीतील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, निवारा केंद्रांची व्यवस्था, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.




