- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी होणार मतमोजणी

नागपूर समाचार : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची पोटनिवडणूक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सदर निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यात 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचार संहितेप्रमाणे सर्व संबंधितांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. या निवडणुकीनिमित्त नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. रचना इंदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 1 जून पर्यंत आहे. अर्जांची छाननी मंगळवार, 2 जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार, 4 जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार 18 जून रोजी होत असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार 22 जून रोजी करण्यात येईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार 25 जून पूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

या निवडणुकीच्या मतदानासाठी सुमारे 14 मतदान केंद्र अपेक्षीत धरण्यात आले आहेत. यात अंतिम यादी प्रत्यक्ष पाहणी करुन दिनांक 20 मे रोजी सायंकाळ पर्यंत जाहीर केली जाईल. एकूण मतदार 834 असून अंतिम आकडेवारी मनपा आयुक्त, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी यांच्याकडून पडताळून निश्चित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही यादी लवकरच जाहीर केली जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिताबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आचार संहितेबाबत स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध आहे. आदर्श आचार संहिताबाबत जर कुणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी या समितीशी, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या विविध विभाग प्रमुखांच्या समित्यांची निर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचार संहितेबाबत कोणाची तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा परिषदेस अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे करण्यास त्यांनी सांगितले.