नागपूर समाचार : कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. पाऊस असो, पूर असो अथवा इतर घटना असोत, अशा प्रसंगी गावपातळीपासून असलेल्या संबंधित यंत्रणांनी कायम दक्ष असले पाहिजे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी अधिक सक्षम व सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पूर्व मानसून आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील धरणांची स्थिती, वीज पडून होणारे मृत्यू, पूरस्थिती, आरोग्य तयारी तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात दरवर्षी वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. खबरदारीच्या उपाययोजना नागरिकांनी घेतल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते. हवामान विभागामार्फत याचा अंदाज अगोदर व्यक्त केला जातो. याची माहिती आकाशवाणी व इतर सोशल मिडीयाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश त्यांनी दिले. वीज व पावसाबाबतचे वॉर्निंग अलर्ट तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या.
जिल्ह्यात सध्या ५०० “आपदा मित्र” कार्यरत असून एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस, होमगार्ड आणि स्थानिक यंत्रणांशी समन्वय वाढविण्यावर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कुही तालुक्यातील अंभोरा परिसरात पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून अनेकदा दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
आपत्तीच्या घटनांबाबत अफवा व चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी “नागपूर संवादसेतू” या चॅटबॉटचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी 8669494944 या क्रमांकाचा वापर करून अधिकृत माहिती मिळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले.




