- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : एआयच्या बळावर विदर्भातील शेतीला मिळणार नवी दिशा; केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रिया सुरु; उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विकास केंद्र बारामती आणि ॲग्रोव्हिजनचा संयुक्त पुढाकार

नागपूर समाचार : विदर्भात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे संस्थापक संचालक प्रतापराव पवार, राजेंद्र पवार यांच्या सहकार्याने ॲग्रोव्हिजन च्या माध्यमातून सरू असलेले प्रयत्न निश्चितच शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतील , असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री तथा ॲग्रोव्हिजन चे मुख्य प्रवर्तक ना. श्री. नितीन गडकरी व्यक्त केला आहे.

प्रतापराव पवार व राजेंद्र पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा करताहेत; ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून विदर्भात यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. भविष्यात विदर्भातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. विदर्भात ऊस, संत्रा आणि तूर या प्रमुख पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यासोबतच सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांच्या उत्पादकांचे गट तयार करून त्यांनाही या उपक्रमात सहभागी केले जात आहे.

रिअल टाईम माहितीमुळे अचूक निर्णय

या प्रकल्पांतर्गत वेदर स्टेशन, मृदा सेन्सर, ड्रोन आणि सॅटेलाईटच्या साहाय्याने मातीची स्थिती, पावसाचे प्रमाण, आर्द्रता आणि पिकांच्या आरोग्याची रिअल टाईम माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या अचूक माहितीच्या आधारे पाणी, खते आणि कीटकनाशकांचा वापर नियोजनबद्ध व प्रमाणात करता येतो. यामुळे पाणी, खते आणि कीटकनाशकांची बचत तर होतेच, शिवाय उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्क्यांची घट होते. त्याचबरोबर पिकांच्या उत्पादनातही ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शाश्वत आणि नफा देणारी शेती साध्य होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व नोंदणी प्रक्रिया

एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती मागविण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे ॲग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र संयुक्तपणे नोंदणीकृत शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य करणार आहेत. शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून याद्वारे शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागविण्यात येत आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी हा फॉर्म ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या कार्यालयाशी संपर्क साधून मागवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधुनिकतेची कास धरण्याचे आवाहन

शेतकरी हा ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याने कृषी क्षेत्रात अत्याधुनिक बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून टेक्नोसेवी बनणे ही काळाची गरज आहे. योग्य पद्धतीचे पीक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारभावांचा विचार करून पीक निवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल.

सध्याच्या जागतिक बाजारपेठेत दर निश्चितीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव असल्याने माहिती-आधारित शेतीला पर्याय नाही. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ पर्याय नसून, भविष्यातील समृद्ध शेतीचा पाया ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.