

तालुका पातळीवरील सर्व विभागांच्या परस्पर समन्वयातून निर्णय प्रक्रियेला मिळाली गती श – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
172 प्रकरणे गावपातळीवरच मार्गी, तब्बल 1279 अधिकारी-कर्मचाऱ्यांची, गावपातळीवर विविध बैठकांसाठी उपस्थिती
नागपूर समाचार : ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल यंत्रणा व जिल्हा परिषद यांचा प्रभावी समन्वय आवश्यक असतो. हा समन्वय साधून अनेकांचे प्रशासनाशी निगडीत असलेले प्रश्न गाव पातळीवरच मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी नुकतेच जिल्हा प्रशासनाला दिले होते. या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर नागरिकांशी संवाद या विशेष मोहिमेअंतर्गत घेऊन 172 प्रकरणांचा जागीच निपटारा करुन लोकाभिमुख प्रशासनाचा नवा मापदंड निर्माण केला. ही मोहीम संपूर्ण जिल्हाभर दिनांक ८ ते १३ जानेवारी या सहा दिवसात सलग राबविण्यात आली.

या विशेष मोहिमेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह सहा दिवसात अकरा तालुक्यांना सामुहीक भेट देऊन तालुका पातळवर विविध योजनांचा आढावा घेतला. पंचायत समितींचे गट विकास अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी व इतर विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यात शेतकरी, विविध योजनांच्या लाभासाठी उत्सुक असलेले नागरीक अशा एकूण 610 लोकांनी त्यांच्याशी संवाद साधला. यात 565 निवेदने प्राप्त झाली. यापैकी तात्काळ 172 प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात यश मिळाले.

जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, महसूल व इतर विभागाचे सुमारे 1 हजार 279 अधिकारी – कर्मचारी हे स्थानिक पातळीवर घेतल्या गेलेल्या विविध बैठकीस प्रत्यक्ष हजर होते. यात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्ग्राम सेवक यांच्या संयुक्त बैठका घेवून आढावा घेतांना ज्यांच्याकडे प्रकरण प्रलंबित आहेत अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना जागेवरच निर्देश देऊन या उपक्रमातून गती देण्यात आली. घरकूल योजना, झुडपी जंगल प्रस्ताव, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजना, तुकडेबंदी कायद्यातील अलीकडील सुधारणा, सर्वांसाठी घरे योजना, जमिनीचे स्वामित्व, प्रॉपर्टी कार्ड, ई-फेरफार आदी कामांना या मोहिमेतून गती मिळाली.
”अनेकवेळा लोकांच्या जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात ज्या तक्रारी येतात यात विविध विभागांचा समन्वय नसल्याचे प्रामुख्याने लक्षात येते. हा समन्वय गावपातळीपासून सक्षम व्हावा या दृष्टीने ही मोहीम यशस्वी झाली. शासकीय कार्यालयात जेव्हा एखादा सामान्य व्यक्ती जाईल तेव्हा त्याला योग्य मार्गदर्शनाचा जबाबदार प्रशासनाचा प्रत्यय स्थानिक अधिकारी देतील असा विश्वास आहे.” – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
दर तीन महिन्यात सदरची मोहीम राबविण्यात येणार
पुढील मोहीम दिनांक ४ ते ११ मार्च या कालावधीत होणार, मोहिमेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ही मोहीम दिनांक ४ ते ११ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. दिनांक ४ मार्च रोजी कामठी व मौदा, ५ मार्च रोजी काटोल व नरखेड, ६ मार्च रोजी रामटेक व पारशिवणी, ७ मार्च रोजी उमरेड, भिवापूर व कुही, ९ मार्च रोजी सावनेर व कळमेश्वर, १० मार्च रोजी हिंगणा व नागपूर ग्रामीण आणि ११ मार्च रोजी नागपूर शहर येथे राहील असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.





