- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ना. श्री. नितीन गडकरी यांनी पश्चिम व उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद

गोरगरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प

नागपूर समाचार : गेल्या दोन दशकांमध्ये नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. विशेषतः गेल्या अकरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आणि बरीच कामे सुरू आहेत. रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता प्रत्येक क्षेत्रातील प्रश्न सोडवून गोरगरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम व उत्तर नागपुरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

शनिवार, दि. १० जानेवारीला पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक १०, १२, १३ व १४ येथील गिट्टीखदान चौक व हजारी पहाड चौक तर उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक २ येथील म्हाडा कॉलनी येथे ना. श्री. गडकरी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. कांचन बक्सरिया- मसराम, शुभरशनी खोडे-रामटेके, डॉ. वैशाली चोपडे, गिरीश ग्वालबंशी, योगिता तेलंग, माधुरी टेकाम, विनोद कन्हेरे, प्रगती पाटील, दर्शनी धवड, माया ईवनाते, साधना बरडे, विक्रम ग्वालबंशी, योगेश पाचपोर, ऋतिका मसराम, वर्षा चौधरी, विजय होले, डॉ. सरिता माने, अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे आणि पंकज यादव या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभा घेण्यात आल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, किसन गावंडे, दत्ता खोडे, स्वप्निल खडगी यांची उपस्थिती होती. 

पाणी, रस्ते, स्वच्छता, उद्याने-मैदान आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १९९७ मध्ये ८ पाण्याच्या टाक्या होत्या, आज १०३ आहेत. पूर्वी १८ उद्याने होती, आज २०५ उद्याने आहेत. खेळाची मैदाने ८ होती, आज १२३ आहेत. मात्र, मी या आकडेवारीने समाधानी नाही. नागपुरातील मुलं संध्याकाळी ५ नंतर मैदानावर खेळायला हवी, असा प्रयत्न असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले.

नागपुरात चोवीस तास पाणी पुरवठा योजना सुरू केली. जुनी पाईपलाईन बदलविण्याचे काम सुरू आहे. गेल्या वीस वर्षांतील सुधारणांमुळे आज नागपुरात पाण्याची समस्या नाही. पश्चिम नागपुरात तर गोरेवाडा असल्यामुळे पाण्याचा प्रश्नच नाही. स्टीलच्या पाईपलाईनमुळे लिकेजेस दूर झाले. आता चढावावर असलेल्या वस्त्यांमध्ये देखील पाणी पुरवठा सुरळीत आहे, असेही ते म्हणाले.

नागपुरातील रस्ते छान झाले आहेत. पुढच्या ५० वर्षांपर्यंत रस्त्यांना काहीही होणार नाही. पोलीस लाईन टाकळीपासून काटोलरोडवरील टोलनाक्याच्या पुढे नेणारा मोठ्ठा उड्डाणपूल होणार आहे. तीन महिन्यांच्या आत त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. फुटाळ्याचे फाऊंटेनदेखील लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

१३५ सिटर वातानुकुलित बस नागपूरच्या रिंगरोडवरून फिरणार आहे. पश्चिम नागपुरातील काटोलरोडवरून सुरू होईल आणि ५२ किलोमीटरचा प्रवास करून गिट्टीखदान चौकात येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

११ बैठका, ६ जाहीर सभा

ना. श्री. नितीन गडकरी यांनी गेल्या दोन दिवसांत तब्बल ११ बैठका आणि सहा जाहीर सभा घेतल्या. आज, शनिवारी त्यांनी प्रभाग ७, ९, १७, ३१, ३३ मध्ये बैठकांद्वारे स्थानिकांशी संवाद साधला. तर संध्याकाळी महायुतीच्या उमेदवारांसाठी सलग तीन जाहीर सभा घेतल्या. उद्या, रविवार, दि. ११ जानेवारीला ना. श्री. गडकरी यांच्या ५ बैठका आणि तीन जाहीर सभा होणार आहेत.