नागपूर समाचार : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित ‘51व्या संसदीय अभ्यासवर्गा’चे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा अभ्यासवर्ग म्हणजे फक्त प्रशिक्षण नाही, तर लोकशाहीशी जिवंत संवाद साधण्याची संधी आहे. या अभ्यासातून केवळ लोकशाही मूल्ये शिकण्यापेक्षा लोकशाही प्रत्यक्ष कशी कार्य करते, संस्था कशा चालतात, निर्णयप्रक्रिया कशी घडते याची सखोल जाणीव होते. त्यामुळेच हा अभ्यासवर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारताच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या संविधानाने आपल्याला सर्वसमावेशक लोकशाही दिली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना करताना सर्वसामान्य नागरिकांच्या आकांक्षा, अपेक्षा आणि अधिकार यांना केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी उभ्या केलेल्या संविधानिक संस्थांमुळे लोकशाही अधिक सक्षम, उत्तरदायी आणि पारदर्शक बनली आहे. म्हणूनच भारताची लोकशाही सतत मजबूत होत असून आज जगातील सर्वोत्तम लोकशाही म्हणून भारताकडे अभिमानाने पाहिले जाते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संसद आणि विधिमंडळ यांची चौकट संविधानानेच दिली आहे. विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील संतुलन ही लोकशाहीची रचना आहे. विधानमंडळ सदस्यापासून मंत्रिमंडळ सदस्य झाल्याबरोबर कार्यकारी मंडळ म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना आम्ही विधानमंडळास उत्तरदायी असतो. विधानसभेत विधिमंडळाचे कामकाज, कायदे करण्याची प्रक्रिया, लोकहिताचा विचार, आर्थिक तरतुदी आणि राज्याच्या तिजोरीवरील नियंत्रण ही संपूर्ण प्रक्रिया सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे.
प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर, विविध विषय समित्या, अंदाज समिती यांसारख्या संसदीय साधनांमुळे शासनावर सतत वैधानिक नियंत्रण शक्य होते. त्यामुळे ‘महाराष्ट्रात टाचणी पडली तरी त्याचा आवाज विधिमंडळात ऐकू जातो’ असे चित्र दिसते. हीच लोकशाही जिवंत ठेवणारी ताकद आहे.
या संपूर्ण संविधानिक आणि संसदीय रचनेशी युवांना जोडण्यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाने अभ्यासवर्गांची ही व्यवस्था उभी केली आहे. हा अभ्यास केवळ राजकारणासाठी नव्हे, तर सार्वजनिक जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व अभ्यासकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




