- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राज्य महिला आयोगाच्या वतीने वनामती येथे महिलांसाठी आयोजित ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले

नागपूर समाचार : राज्य महिला आयोगाच्या वतीने वनामती येथे महिलांसाठी आयोजित ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात मुले तसेच महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या काळात अनेक नवीन योजना, उपक्रम आम्ही सुरु केले. राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेजे करणे आवश्यक आहे ते सर्व करु, याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. महिला सुरक्षित नसतील तर समाज सक्षम होणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात महिला सुरक्षाविषयक बाबींमध्ये अनेक अमुलाग्र बदल केले. कालबाह्य कायदे रद्द करुन नवीन कायदे आणले आहेत. हे कायदे महिलांसाठी कवच कुंडले आहेत. या कायद्यातील तरतुदींची माहिती महिला आयोगामार्फत जनजागृतीच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचवावी, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार मनिषा कायंदे, चित्रा वाघ, विक्रम काळे, मंजूळा गावित, सना मलिक, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवळे, आयोगाच्या माजी सदस्य निता ठाकरे आदी उपस्थित होते.