नागपूर समाचार : नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा नऊ दिवसीय पहिल्या नागपूर बुक फेस्टिव्हल 2025 चे शनिवारी फित कापून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यांनी पुस्तक प्रदर्शनाची यावेळी पाहणी केली.
रेशीमबाग मैदानावर पार पडलेल्या या समारंभाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील, एनबीटी इंडिया अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी; श्री. अजय संचेती, अध्यक्ष, झिरो माईल यूथ फाउंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी, पुस्तकप्रेमी, साहित्य, कला क्षेत्रातील लोक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात श्री नितीन गडकरी यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, हे केवळ मनोरंजन नाही. पुस्तकातून जे विचार आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात, त्यातून व्यक्तिमत्व घडते. मी शोलय जीवनात बाबासाहेब पुरंदरे, रणजीत देसाई, शिवाजी सामंत यांची पुस्तके वाचली. त्यांचा माझ्या जीवनावर परिणाम झाला.
आपला देश ज्ञानाचे भंडार असून देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृत, परंपरा ही आपली मोठी शक्ती आहे. देशाला विश्वगुरू करायचे असेल, देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर ज्ञान प्राप्त करावे लागेल व हे ज्ञान पुस्तकांतून प्राप्त होते, असे नितीन गडकरी म्हणाले.
त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करून हा महोत्सव नागपूरचा वार्षिक सांस्कृतिक उत्सव म्हणून प्रतिष्ठित व्हावा अशी आशाही व्यक्त केली व नागपूर व विदर्भातील जनतेला महोत्सवात येऊन पुस्तके खरेदी करावी, असे आवाहन केली.
अमिश त्रिपाठी मोठ्या संख्येने उपस्थित मुलांना संबोधित करताना म्हणाले, “पिझ्झा, बर्गर जसे शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात तसेच, इन्स्टाग्राम, फेसबुक बौद्धिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यातून बाहेर पडायचे असेल, प्रगती करायची असेल तर पुस्तके वाचली पाहिजे, काल्पनिक गोष्टी वाचल्या पाहिजे.
मा. श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, “पहिल्याच वर्षी नागपूर पुस्तक महोत्सवाला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. हा महोत्सव सातत्याने चालू रहावा आणि पुण्याला जशी पुस्तकाची जागतिक राजधानी अशी मान्यता मिळाली आहे, तशी नागपूरलाही मिळावी, अशी अपेक्षा आहे.
प्रा. मिलिंद सुधाकर मराठे यांनी प्रास्ताविकातून सर्व मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, पुण्यानंतर भारताच्या मध्यभागी पहिला नागपूर बुक फेस्टिव्हल आयोजित करण्याचा आम्हाला अभिमान आहे. वाचक, लेखक आणि विचारवंतांनी एकत्र येऊन संवाद साधावा, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका मिश्रा यांनी केले तर आभार अजय संचेती यांनी मानले.
नागपूर बुक फेस्टिव्हल 23 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला असून दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळात सर्वांसाठी मोफत प्रवेश असून सर्व पुस्तके विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ट्रान्सजेंडर कलाकारांनी ‘मंगलमुखी’
ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करणाऱ्या विश्व ममत्व फाउंडेशनच्या शिवमुद्रा डान्स ग्रुपने नागपूर पुस्तक महोत्सवात आज ‘मंगलमुखी – कलर्स ऑफ इंडिया’ हा अप्रतिम कार्यक्रम सादर केला. विविध राज्यातील लोकनृत्य व राज्यनृत्याद्वारे भारतीय संस्कृतीचे विविध रंग कलाकारांनी प्रस्तुत केले. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, सुरेख नृत्यदिग्दर्शन, लोकसंगीताची लय आणि आकर्षक प्रकाशयोजना यामुळे कार्यक्रमाचे सौंदर्य अधिक खुलून आले. या नृत्याचे यावेळी सर्व कलाकारासह कोरिओग्राफर जय कैथवास, अमर मोरकर व पवन पंढरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्वरा करंजगावकर यांनी केले. संस्थेच्या अध्यक्ष श्रद्धा जोशी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’ चे आज, 23 रोजी उद्घाटन
नागपूर पुस्तक महोत्सव २०२५ अंतर्गत २३–२४ आणि २९–३० नोव्हेंबर दरम्यान ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आज, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, लेखक व शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, संचालक श्री. युवराज मलिक, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री. सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष श्री. अजय संचेती आदी उपस्थित राहतील.
उद्घाटनानंतर 1 ते 5 वाजेदरम्यान लेखक अक्षत गुप्ता, नितीन गोखले, प्रशांत पोळ, सरिता कौशिक, सुप्रसिद्ध दिग्दर्शक विपुल शाह यांची सत्रे होतील. सायंकाळी 6 वाजता सुफी व बॉलिवूड संगीत – साधो बँड या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.




