‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ चा दुसरा दिवस
नागपूर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस राममय झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तरुणाईचा लाडका गायक विशाल मिश्रा ने आज गली गली नागपूर सजायेंगे…राम आएंगे हे गीत सादर करून नागपूरकरांचे ‘ दिल ‘ जिंकले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2025 च्या दुसऱ्या दिवशी शनिवारी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट पार पडली.
विशाल मिश्राला ऐकण्यासाठी तरुणाईने हाऊसफुल गर्दी केली होती. पटांगणाच्या बाहेर देखील हजारोच्या संख्येने लोक जमले होते.
मी लहान घरातून मोठे स्वप्न बघत आलो. मी तुमच्यातलाच आहे तुमच्यासाठी आहे.. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, माझा प्रत्येक शब्द, स्वर तुमच्यासाठी आहे, आयुष्यभर राहील, असे म्हणत विशाल मंचावरून खाली उतरला तेव्हा छोटया मुलांनी त्याचे भोवती गराडा घातला.

तू पहला पहला प्यार है मेरा, तुम हो तो सब आसान, कोई इतना खुबसुरत कैसे हो सकता है, मैं चाहू तुझको बेपनाह, क्या मुझे प्यार है, तेरे दिल पे हक मेरा है अशी गाणी सादर करून तरुणाईच्या हृदयाला हात घातला. आयुष्यभर तुमच्यासाठी असेच गाणे तयार करत राहील.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, ॲड. सुलेखाताई कुंभारे, व महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात झालेल्या गीता पठण विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र रेणू अग्रवाल व मनोज तत्ववादी यांच्याकडून नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आले.

खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांनी केले आहे.
एक लाख क्षमतेचे स्टेडियम व्हावे – नितीन गडकरी
कार्यक्रमांना नागपूरकरांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद हीच या महोत्सवाच्या यशाची पावती आहे.
पण जागेअभावी बऱ्याच लोकांना महोत्सवातील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे भविष्यात एक लाख क्षमता असलेले स्टेडियम नागपुरात तयार व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
सकाळच्या सत्रात झालेल्या गीता पठणाच्या तीन विश्वविक्रमांबद्दल त्यांनी शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
हा महोत्सव शहरासाठी सुंदर उपहार – देवेंद्र फडणवीस
स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना मंच देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंतांची कला बघण्याची संधी देणार खासदार सांस्कृतिक महोत्सव हा शहराला मिळालेला सुंदर उपहार आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले.
गीतेचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा महोत्सव समितीने आयोजित केलेल्या गीता पठण उपक्रमाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.




