- Breaking News, Meeting

महाराष्ट्र समाचार : पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ₹8000 कोटींचा सामंजस्य करार

महाराष्ट्र समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन (जलसंपदा विभाग) आणि जीएससी पीएसपी महा प्रा. लि. यांच्यात, धुळे-नंदुरबार जिल्ह्यात पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासंदर्भात ₹8000 कोटींच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यात आतापर्यंत एकूण 50 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी करार झाले आहेत. या ऐतिहासिक 51 व्या सामंजस्य करारामधून 1500 मेगावॅट वीज निर्मिती, ₹8000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि हजारो रोजगारांच्या संधी महाराष्ट्रात निर्माण होणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुंतवणूकदारांना जलवापर, पर्यावरणीय मंजुरीसह सर्व परवाने ‘फास्ट-ट्रॅक’ यंत्रणेद्वारे जलदगतीने मिळतील. सह्याद्री पर्वतरांगांतील अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे महाराष्ट्रात उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठी संधी आहे. राज्याने ग्रीड स्थिरतेसाठी 1 लाख मेगावॅट क्षमतेच्या उदंचन प्रकल्पांच्या उभारणीचे लक्ष्य ठेवले असून, त्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रीय ऊर्जा ग्रीड स्थिर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावेल.

महाराष्ट्र सौरऊर्जेच्या क्षेत्रातही नवा इतिहास रचत आहे. महाराष्ट्रामध्ये आशियातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे 16 गिगावॅट वितरित सौरऊर्जा क्षमता निर्माण होणार असून, शेती क्षेत्रातील ऊर्जेची संपूर्ण गरज सौरऊर्जेकडे वळवली जाईल. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रणी ठरून पर्यावरणस्नेही, शाश्वत विकासाकडे वाटचाल करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी जीएससीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदा, संचालक शुभ नंदा आणि अधिकारी उपस्थित होते.