महादूला येथे गोरगरिबांना जागेच्या सनदेचे पट्टे वाटप
कोरडी मंदिर टी पॉईंट येथे महादुला बस स्टॉप व पोलीस चौकीचे उद्घाटन
नागपूर समाचार : आजवर केवळ व्यापक जनहित डोळ्यापुढे ठेवून काम करीत आल्याने माय-बाप जनतेने मला महसूलमंत्री म्हणून स्वाक्षरी करण्यापर्यंतची संधी दिली. जनतेप्रती कृतज्ञता व तुम्ही दिलेल्या विश्वासार्हतेच्या बळावर आज कोरडी, महादुला, कामठी सह नागपूरच्या भागातील अनेक वर्षांपासून झोपडीत राहणाऱ्या व्यक्तींना ते ज्या जागेवर राहत आहेत त्या जागेच्या मालकीचा पट्टा अर्थात जागेची सनद देता येणे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

सेवा पंधरवडा मध्ये राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे कोरडी देवीच्या महाप्रवेश द्वाराजवळ आयोजित गरजू लाभार्थ्यांना पट्टे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
या समारंभासमवेत महादूला येथील कोरडी मंदिर टी पॉईंट येथे महादुला बस स्टॉप व पोलीस चौकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी पाटील, सह पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार आदी वरिष्ठ अधिकारी यांची पोलीस चौकीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती होती. पट्टे वाटप समारंभास उपविभागीय अधिकारी संदीप भस्मे, मुख्याधिकारी अमर हांडा, अनिल निधान, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी, मंगेश यादव श्री.श्री फाउंडेशनचे संस्थापक संकेत बावनकुळे, शब्बीर शेख आदी स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या घराचे स्वामित्त्व प्रत्येक गोरगरीबाजवळ असले पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत. एकही व्यक्ती स्वतःच्या मालकीच्या घरापासून वंचित राहू नये यासाठी पंतप्रधान आवास योजना, त्याच्या जोडीला पट्टे वाटप मोहीम व लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घरकुल योजना आपण सामाजिक कटिबद्धतेतून राबवित असल्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले.

महादुला, कोराडी परिसरात आपण विविध उपक्रम हाती घेतले आहेत. टी पॉईंट जवळ आपण उत्तम सुलभ शोचालय बांधत आहोत. याची निगा व व्यवस्थापनाचे काम आपण बचत गटातील महिलांना देणार आहोत. याची उत्तम निगा संबंधित महिला बचत गट घेईल.
याचबरोबर महादुला क्षेत्रात भव्य संविधान भवन साकारत आहोत. यासाठी एकूण आठ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १७ फुटी भव्य पुतळा व उद्याच्या जगात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, शासनात उच्च पदावरील नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी यासाठी भव्य अद्ययावत प्रशिक्षण केंद्र व विविध उपक्रम साकारत असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध लाभार्थ्यांना पट्टे वाटपाची सनद देण्यात आली.




