नागपूर समाचार : नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या शुभहस्ते The Brahmastra Unleashed या पुस्तकाचे अनावरण सोहळा दि 14 सप्टेंबर 2025 रोजी सायं 6.00 वाजता नागपूर येथील चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हे पुस्तक महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक तसेच नागपूर शहराचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लेखन केलेले आहे.
या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल आपल्या मनोगतात म्हणाले की,“मुंबई शहरात 90 च्या दशकात अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेले धैर्य, शिस्त आणि कार्यकुशलता ही खरोखरच प्रशंसनीय होती. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर अनेकांनी लेखन केले, चित्रपटही साकारले गेले, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून त्या काळाचे वस्तुनिष्ठ चित्रण नव्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”डॉ. सिंगल यांनी पुढे असेही नमूद केले की,“या पुस्तकामुळे महाराष्ट्र पोलीस दल तसेच सर्वसामान्य जनतेला त्या काळातील परिस्थितीचे वास्तव समजून घेण्यास निश्चितच मदत होईल.”
सेवानिवृत्त पोलीस महासंचालक व लेखक डी. शिवानंदन यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,“नागपूर व मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्य करण्याची संधी मला लाभली. मुंबईतील गुन्हेगारी जगतातील विविध पैलू वाचकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. हे पुस्तक वैयक्तिक अनुभव मांडण्यासाठी नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाला समर्पित केले आहे.”
या अनावरण सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागपूर शहरातील पोलीस उपायुक्त निकेतन कदम, नित्यानंद झा, महक स्वामी, ऋषिकेश सिंगारेड्डी तसेच अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड आणि राजेंद्र दाभाडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हेही मान्यवर अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बगारिया तसेच रोटी बँक संस्थेचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.