- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ऑईल मिलर्सच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबध्द – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

गिरणी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर

ऑईल मिलर कॉन्क्लेव्ह संपन्न

नागपूर समाचार :‌ विकसीत महाराष्ट्रासाठी ऑईल मिलर्स असोसिएशनने दिलेले योगदान मोलाचे आहे. अलीकडच्या काळात भारताने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली असून भारतीय पासपोर्टसाठी जगात ओढ निर्माण झाली आहे. ऑईल मिल असोसिएशनने विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. आपल्या समस्या व अडचणी राज्य शासन केंद्र शासनाकडे मांडण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मध्य भारत ऑईल मिलर्स असोसिएशनच्या वतीने कोराडी येथील नैवद्यम नॉर्थ स्टार हॉटेल येथे ऑईल मिलर कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, विदर्भ कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष भावेश शाह, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोहता, विदर्भ ऑईल असोसिएशनचे अध्यक्ष विपिन अग्रवाल तसेच असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या उद्योगात सुधारणा आवश्यक असून त्याबाबत केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशिल आहे. कापूस महामंडळ, आईल मिलच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे पाठपूरावा करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नवीन उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढ करीत आहेत. ही बाब अभिनंदनीय असल्याचे यांनी सांगितले.

तेल गिरण्या कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी अशा कान्क्लेव्ह महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. कामगारांच्या समस्याचे निराकरण होते. मला या क्षेत्रातील जाण असल्यामुळे आपल्या समस्या समजून घेता येतात. शासनस्तरावर पणन मंत्र्यांशी चर्चा करुन कामगाराचे प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

सौर उर्जेबाबत विद्युत विभागाशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्यात येईल. ऑईल मिलच्या मालकांनी कामगाराचे अडचणी स्थानिक पातळीवर सोडविल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्वाचा असून महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये ठेवण्यास शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या परिषदेत मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आदी राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुशल कामगार, तेलाची गुणवत्ता, मात्रा, शुध्दीकरण, सौर उर्जा, गिरणी मालकांचे प्रश्नाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *