शहरातील ७० गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार : ईद निमित्त देखील रक्तदान
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत मनपा आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनाला शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ७० गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय मंगळवारी झोनअंतर्गत ईद निमित्त देखील रक्तदान करण्यात आले. मनपा मुख्यालायासह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील रक्तदान शिबिरांमधून एकूण २००२ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी मंडळांचे अभिनंदन करित मनपातर्फे आभार देखील मानले आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या नेतृत्वात झोन स्तरावर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मनपा पॅनल मधील रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा येथील रक्तपेढी आणि शहरातील इतर खासगी रक्तपेढीच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात आले.
मनपाद्वारे राबविण्यात आलेल्या या विविध गणेशोत्सव मंडळांमधील रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी झोनमधील गणेशोत्सव मंडळांमध्ये तसेच ईद निमित्त देखील आयोजित ८ रक्तदान शिबिरांमधून सर्वाधिक १००८ युनिट रक्त संकलित करण्यात आले. या कामगिरीबद्दल झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान व त्यांच्या नेतृत्वातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनपातर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.