- Breaking News, राष्ट्रीय समाचार

नागपूर समाचार : भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली समाचार : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांचे हृदयपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले, “मा. सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. आपले जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील आपले योगदान प्रेरणादायी आहे. आपल्या अनुभव आणि दूरदृष्टीमुळे भारत नव्या उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सशक्त स्थान प्राप्त करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपले मार्गदर्शन अमूल्य आहे. आपली ही नवीन यात्रा यशस्वी आणि लोककल्याणकारी ठरो, अशी मी प्रार्थना करतो.”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना म्हटले, “महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा! त्यांची महाराष्ट्रातील राज्यपालपदाची कारकीर्द छोटी असली तरी त्यांनी राज्यपाल पदाचा गौरव वाढवला. समर्पण आणि विनम्र नेतृत्वाचा हा सन्मान आहे. विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘रालोआ’च्या नेतृत्वाने सुयोग्य उमेदवार देऊन देशासमोर उदाहरण ठेवले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करत, अजित पवार यांनी त्यांच्या अनुभवाचा देशाच्या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

हा विजय राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या एकजुटीचा आणि केंद्र सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा प्रतीक असल्याचे सांगत, अजित पवार यांनी राधाकृष्णन यांच्या विजयाने महाराष्ट्रातील जनतेचा आनंद द्विगुणित झाल्याचे नमूद केले. “हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. राधाकृष्णन यांचे नेतृत्व संसदीय परंपरा बळकट करण्यास आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचे संवर्धन करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *