भाजयुमोचा स्तुत्य उपक्रम – पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
नागपूर समाचार : नव्या कोऱ्या सायकलींवर स्वार होण्याची संधी मिळताच कामगार वस्तीतल्या मुलांचे डोळे चमकले, चेहऱ्यावर आनंद पसरला. स्वप्नवत वाटणारी इच्छा प्रत्यक्षात उतरल्याचा क्षण अविस्मरणीय ठरला. 300 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना काल सायकलींचे वाटप करण्यात आले आणि संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला.
हा उपक्रम झाला आ. संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त. वाढदिवस ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प युवा कार्यकर्त्यांनी केला होता. दक्षिण-पश्चिम नागपूर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या पुढाकारातून ही अभिनव कल्पना साकार झाली.
सर्वेक्षणातून उगमलेली कल्पना
काही दिवसांपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांनी कामगार नगर व गायत्री नगर परिसरात सर्वेक्षण केले. ‘शिक्षणासाठी सर्वाधिक गरज कोणती?’ असा प्रश्न पालकांना विचारला असता, “मुलांकडे सायकल असती तर शाळेत जाण्या-येण्यात सोय झाली असती,” हे उत्तर बहुसंख्य पालकांनी दिले. त्या उत्तराने कार्यकर्त्यांना दिशा मिळाली.
सायकली खरेदीसाठी मोठा खर्च अपेक्षित होता. परंतु युवा नेते पारेंद्र पटले व त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना उद्देश सांगितला. या उपक्रमाची महत्ता समजताच अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले. परिणामी, स्वप्नवत वाटणारी संकल्पना वास्तवात आली.
शानदार सोहळा आणि भावनिक क्षण
त्रिमूर्ती नगर येथील भगवती सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात आ. संदीप जोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष मुलांना शैक्षणिक साहित्यही देण्यात आले.
आम्हाला रोज ४-५ किमी चालत शाळेत जावे लागायचे. आता ही सायकल मिळाल्यामुळे अभ्यासासाठी वेळ वाचेल, असे एका विद्यार्थ्याने आनंद व्यक्त केला. या शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, माजी नगरसेवक लाहुकुमार बेहेते, सोनाली कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पारेन्द्र पटले यांच्या संकल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी भाजपचे सुभाष नगर मंडळ महामंत्री नितीन महाजन, नीलेश राऊत आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.




