नागपूर समाचार : क्षयरोग ग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान योग्य पोषण मिळावे या उद्देशाने, केंद्र सरकारच्या ‘निक्षय मित्र’ या अभियानांतर्गत विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने क्षय रुग्णांचे पालकत्व घेतले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या २०० रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
विदर्भ इन्फोटेकने ‘निक्षय मित्र’ बनून मनपाच्या २०० टीबी रुग्णांना त्यांच्या उपचारादरम्यान दर महिन्याला पोषण आहार किट देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे उपचाराचा कालावधी पूर्ण होईपर्यंत या रुग्णांना नियमितपणे पौष्टिक आहार उपलब्ध होणार आहे.
पोषण आहार किट वाटपाचा कार्यक्रम व्हीआयपीएल च्या कार्यालयात पार पडला. यावेळी व्हीआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत उगेमुगे, श्रेयस उगेमुगे आणि नागपूर शहराच्या टीबी अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांच्या हस्ते रुग्णांना किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मनपाच्या गायत्री नगर येथील आरोग्य वर्धीनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा माडणकर, संजीव कुमार, उत्तम मधुमटके, अरविंद चव्हाण, रूपाली गोडे आणि ज्योत्स्ना गजभिये यांचीही उपस्थिती होती.