- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : बाप्पाच्या स्वागतासोबतच सुरक्षेला प्राधान्य द्या: गणेशोत्सव मंडळांना महावितरणचे आवाहन!

नागपूर समाचार : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या आनंदात कुठलेही विघ्न येऊ नये, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वीज जोडणी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे महावितरणने स्पष्ट केले आहे. 

घरगुती दरात अधिकृत जोडणी : सुरक्षा आणि बचतीचा दुहेरी फायदा 

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणुन नुकतेच घोषित केले आहे. सार्वजनिक उत्सव आनंददायी आणि सुरक्षित करण्यासाठी, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती दराचे वीजदर निश्चित केले आहेत. यामुळे मंडळांनी अनधिकृत जोडण्या टाळाव्यात आणि अधिकृत वीजपुरवठा घ्यावा. यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका टाळता येतो. मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था केवळ अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्याची सूचनाही महावितरणने दिली आहे.

सुरक्षित उत्सवासाठी महत्त्वाची खबरदारी

सुरक्षित अंतर राखा : रोषणाई आणि देखावे उभारताना परिसरातील वीज वाहिन्या, खांब किंवा वितरण रोहित्रांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

योग्य न्यूट्रलचा वापर : वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घ्या. यामुळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होऊन होणारे संभाव्य अपघात टाळता येतात.

हुक‘ टाकणे टाळा : जवळच्या वीज खांबांवर किंवा वाहिन्यांवर ‘हुक’ टाकून वीज घेऊ नका. यामुळे जीवित आणि वित्तहानीचा मोठा धोका असतो.

उपकरणांची तपासणी : वीज जोडणीसाठी वापरण्यात येणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खात्री करा. जुनी किंवा तुटलेली तार वापरू नका. सर्व विद्युत उपकरणांचे योग्य अर्थिंग असल्याची खात्री करा आणि वेळोवेळी त्याची चाचणी घ्या.

मल्टी प्लग टाळा : एकाच मल्टी प्लगवर अनेक उपकरणे जोडू नका.

मंडळांसाठी विशेष सुविधा आणि मदतीचे पर्याय

गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरण आपल्या सर्व कार्यालयांतून विशेष शिबिरे आयोजित करत आहे. या शिबिरात मंडळांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात आहे. या जोडणीसाठी मंडळांना नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी, पोलीस परवाना, विद्युत निरीक्षकांचे प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतील.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तात्पुरत्या जोडणीसाठी भरलेली अनामत रक्कम मंडळांना विनाविलंब परत मिळणार आहे. मंडळांनी ही रक्कम ऑनलाइन भरल्यास, गणेशोत्सव संपल्यानंतर वीज बिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम लगेच परत दिली जाईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी, मंडळांनी खालील 24 तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा: 1912, 19120, 18002123435 किंवा 18002333435. याशिवाय, संबंधित भागातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावेत. चला, बाप्पाचा उत्सव साजरा करताना सुरक्षेला प्राधान्य देऊया आणि एका जबाबदार मंडळाची ओळख निर्माण करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *