नागपूर समाचार : नागपूर शहरातील रस्ते पादचारी, वाहनचालकांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सुलभ व्हावेत याकरिता शहरातील रस्त्यांना ‘हेल्दी स्ट्रीट्स‘ रूप देण्याचा निर्धार नागपूर महानगरपालिका आणि आयटीडीपी (ITDP india – इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेल्दी स्ट्रीट्स‘ या उपक्रमाअंतर्गत बुधवारी (ता.३०) वनामती सभागृह येथे आयोजित विशेष कार्यशाळेत उपस्थितांनी केला.
कार्यशाळेला नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मीना, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, पोलीस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी आणि नागपूर महामेट्रोचे महेश मोरोने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहरातील रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. रस्ते हे पादचाऱ्यांसाठी सुयोग्य, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त असायला हवे. असे सांगत डॉ. चौधरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवर दिशादर्शक फलक, सुटसुटीत फूटपाथ व सायकल ट्रॅक असायला हवेत. रस्त्यांचे नियोजन करताना नागरिकांच्या सोयीचा आणि आरोग्याचा विचार व्हायला हवा. वर्धा रोडवरील वॉकेबल स्ट्रीटवर नागरिक सायंकाळी चालताना किंवा सायकल चालवताना आनंद घेतात आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य ही चांगले राहते.
डॉ. चौधरी यांनी अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची आणि गरज पडल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही दिली. पुढील काही महिन्यांत शहरात १५ ते २० किलोमीटर अंतराचे पादचाऱ्यांसाठी अनुकूल मार्ग तयार करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत त्यांनी भर दिला. तसेच कंत्राटदार आणि त्यांच्या कामगारांसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी सांगितले की, नागपूर शहरात दरवर्षी सरासरी ३४८ नागरिकांचा रस्ता अपघातांमध्ये मृत्यू होतो. मात्र, यंदा योग्य पोलिसिंगमुळे आतापर्यंत ७० मृत्यू टळले आहेत. रस्ते सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यांनी रामगिरी मार्गाला ‘हेल्दी स्ट्रीट्स‘ म्हणून विकसित करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांमध्ये शिस्त आणि जनजागृती निर्माण करणे हे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्याची गरज व्यक्त केली. सध्या शहरात वाहने अत्यंत वेगाने चालवली जातात, त्यामुळे शिक्षणपद्धतीत बदल करून वाहतुकीबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. अभियंते आणि कंत्राटदारांनाही प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी नमूद केले.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी रस्त्यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्यावर भर दिला. आयटीडीपी इंडिया तर्फे प्रकल्प व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी, सिद्धार्थ गोडबोले, स्मृती सवाने, यांच्यासह तज्ञ प्रसन्न देसाई, प्रताप भोसले, विकास ठाकर आणि यांनी ‘हेल्दी स्ट्रीट्स’ संकल्पनेची माहिती दिली. तसेच रस्ते कसे असावेत याविषयी सादरीकरण केले.
कार्यक्रमात मनपाचे मुख्य अभियंता मनोज तलेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, अश्विनी येलचटवार, सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, नागपूर सुधार प्रन्यासचे प्रशांत भांडारकर, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या डॉ. प्रणिता उमरेडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.