मुंबई/नागपूर समाचार : नागपूर येथील उप्पलवाडी आणि वांजरा औद्योगिक वसाहतीतील विकासाला चालना मिळू शकली नाही. सरकारने औद्योगिक विकासासाठी उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून भरघोस सवलती जाहीर केल्या असताना दुसरीकडे मात्र औद्योगिक वसाहतींबाबत निराशाजनक वातावरण असल्याने सुविधा व सवलती असूनही त्याचा लाभ नवउद्योजकांना मिळू शकत नाही. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीचा विकासाला अधिक गती देऊन उद्योगाला पोषक वातावरण तयार करण्याची मागणी काँग्रेचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.
यावेळी बोलतांना डॉ राऊत म्हणालेत, नागपूर जिल्ह्यातील साठ वर्ष जुनी असलेली उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. येथील उद्योग वसाहतीत काम करणारे हजारो कामगार, रात्रीच्या अंधारात जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पावसात पिवळी नदीचं पाणी थेट कामगारांच्या दारात घुसतंय. विकासाच्या नावाखाली गोंधळ आणि भ्रष्ट व्यवस्था सुरू आहे. कामगारांचे प्रश्न, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
पिवळी नदीला संरक्षण भिंत नाही, त्यामुळे अतिवृष्टीवेळी नदीचं पाणी औद्योगिक वसाहतीत शिरत असते. अंडरग्राउंड केबल खोदकामानंतर रस्त्यांची दुरवस्था, या ठिकाणी स्ट्रीट लाईट्स नाहीत. रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात रेडिमिक्स काँक्रीटच्या गाड्यांची वाहतूक सुरू आहे. यामुळे आधीच खचलेल्या रस्त्यांची अवस्था गंभीर झाली आहे. महानगरपालिका आणि एमआयडीसीचे समन्वय अभावामुळे या औद्योगिक वसाहतीमध्ये समस्या निर्माण झाले असल्याचे यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.