- Breaking News, PRESS CONFERENCE, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा बुधवार पासून

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचा होणार जागर

केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दि. १६ व १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ पासून संताजी सभागृह, सोमवारी क्वार्टर, सक्करदरा येथे ही स्पर्धा होणार आहे. गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री. लक्ष्मणराव गमे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल, अशी माहिती आज, सोमवार दि. 14 जुलैला पत्रकार परिषदेत देण्यात आली.

उद्घाटन सोहळ्याला भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी असतील. तर अच्युत महाराज सेवा संस्थानचे सचिन देव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक यावले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, ज्येष्ठ समाजसेवक हेमंत काळमेघ यांची प्रमुख उपस्थिती असेल. पत्रकार परिषदेला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी संबोधित केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक व अशोक यावले, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता, उपाध्यक्ष गौरीशंकर पाराशर व माजी आमदार अशोक मानकर, कोषाध्यक्ष राजेश बागडी, दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, विजय फडणवीस, राजेश कुंभलकर, मनिषा काशीकर, किशोर पाटील, भोलानाथ सहारे, श्रीरंग वराडपांडे, दिलीप जाधव, शशांक खेकरे यांची उपस्थिती होती. 

स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाज प्रबोधन आणि राष्ट्रभक्तीपर भजनांचा जागर होणार आहे. खंजरी भजन स्पर्धेत सहभागी होणारी मंडळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक चालींवर आधारित तसेच प्रबोधनात्मक व राष्ट्रभक्तीवर आधारित विषयांवरची २ भजने १२ मिनिटांच्या अवधीत सादर करणार आहेत. नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील मंडळांना ४००० रुपये व नागपूर जिल्ह्यातील सहभागी मंडळांना २००० रुपये मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. अनिल सोले यांनी दिली.

महाअंतिम फेरी १८ जुलैला

या स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती असेल. खंजरी भजन स्पर्धेत विदर्भातील १२४ आणि नागपूरातील १५९ असे एकूण २८३ भजनी मंडळानी सहभाग घेतला आहे. 

विजेत्या मंडळाला १ लाख रुपयांचा पुरस्कार

प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला १ लाख रुपये रोख, उपविजेत्या मंडळाला ७१ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ५१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला ४१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकाला ३१ हजार रुपये, सहाव्या क्रमांकाला २१ हजार रुपये तर सातवा क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला ११ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय १० मंडळांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *