- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार, सम्मानित

नागपुर समाचार : आणीबाणीतील कारावास भोगलेल्या सन्मानधारकांचा शासनाने केला गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली कृतज्ञता; सन्मानधारकांची उत्स्फूर्त उपस्थिती; आणीबाणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर समाचार : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अमूल्य अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा दिवस म्हणून 25 जूनचे स्मरण केल्या जाते. देशावर लादलेल्या आणीबाणीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपल्या घरादाराचा विचार न करता अनेकांनी कारावास भोगला. त्यांच्या या योगदानाप्रती शासनातर्फे आज कृतज्ञता व्यक्त करुन कारावास भोगलेल्या सन्मानार्थींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर आयुक्त तेजुसिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी हे सन्मानपत्र सन्मानार्थींना त्यांच्या जागेवर जाऊन बहाल केले.

आणीबाणी लागू होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सदर येथील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमास बिंदूमाधव उर्फ बंडुजी देव, उमाबाई पिंपळकर, देवेंद्र वैद्य, संध्याताई पंडित व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली कृतज्ञता 

आणीबाणीमध्ये जेलमध्ये जाणे पसंत केलेल्या सर्व सन्मानार्थींनी देशाची लोकशाही वाचविली. एक प्रकारे लोकशाहीच्या रक्षणाचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले. देशावर लादलेल्या हुकूमशाहीचा धाडसाने प्रतिकार करुन स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी केलेला संघर्ष व दिलेले योगदान मोलाचे असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या. देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत. संविधान हत्या दिवस पाळतांना आपण सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ लढण्याचा निर्धार आणखी दृढ करु अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाद्वारे व्यक्त केल्या. या संदेशाचे वाचन तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सर्व सन्मानार्थींना शुभेच्छा देऊन त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सन्मानधारकांची उत्स्फूर्त उपस्थिती

देशासाठी, संविधानासाठी आणीबाणीच्या काळात सोसलेल्या अवहेलनांना विसरुन आपल्या या योगदानाचा शासनातर्फे सन्मान केला जातो आहे ही भावना आमच्यासाठी खुप महत्वाची आहे. स्वातंत्र्याचे मूल्यांसमवेत संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात ज्या जागरुक सैनिकांनी योगदान दिले याबाबत नव्या पिढीला सजग करण्यासाठी असे समारंभ अधिक महत्वाचे असतात, अशी प्रतिक्रीया सन्मानार्थी बिंदूमाधव उर्फ बंडुजी देव यांनी दिली. या समारंभासाठी सर्व सन्मानार्थींनी आपल्या वार्धक्याचा विचार न करता घरातील सदस्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सर्व सन्मानार्थीप्रती शासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार स्नेहलता मेढे पाटील यांनी तर सूत्रसंचा तहसीलदार श्रध्दा बागराव यांनी केले.   

आणीबाणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

नव्या पिढीपर्यंत आणीबाणी लढ्यातील मूल्य पोहचावे, प्रत्येक नागरिकांना मिळालेल्या अभिव्यक्तीसह मौलिक अधिकाराच्या रक्षणाप्रती आणीबाणीमध्ये ज्यांनी कारावास भोगला त्याची माहिती देणाऱ्या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन श्रीपाद रिसालदार, बिंदूमाधव उर्फ बंडुजी देव, जयंत पुराणिक, उमाबाई पिंपळकर, पुष्पाताई तोतडे, मोहन वाघ, शाम देशपांडे, अजय सालोडकर, देवेंद्र वैद्य,संध्या पंडित दिनकर अजंटीवाले, संजय बंगाले, अविनाश देशपांडे, कमलाकर घाटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर आणीबाणी संदर्भात विशेष मुलाखतींवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते. हे चित्रप्रदर्शन नियोजन भवन येथे सभागृहात लावण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *