- Breaking News, नागपुर पुलिस

नागपूर समाचार : राहुल गांधींचे आरोप खोटारडे आणि दिशाभूल करणारे; आमदार संदीप जोशी यांची राहुल गांधींवर टीका

नागपूर समाचार : एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली, की ती लोकांना खरी वाटू लागते. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या याच गोबेल्स नीतीचा अवलंब करत असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार संदीप जोशी यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत ८ टक्क्यांनी मतदार वाढले, काही बुथवर ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली, असा आरोप राहुल गांधी यांनी नुकताच केला होता. या आरोपाचा खरपूस समाचार घेत संदीप जोशी यांनी वस्तुस्थिती मांडली आहे.

राहुल गांधी यांचा आरोप केवळ देवेंद्रजींविरोधात नव्हे, तर संपूर्ण राज्यातील निवडणूक यंत्रणेवरच शंका घेणारा आहे. असे सांगत आ. संदीप जोशी यांनी स्पष्ट केले की, २५ पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांत लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान ८ टक्क्यांहून अधिक मतदारवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यातील बरेच उमेदवार काँग्रेस किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांचे आहेत.

उदाहरणादाखल, पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले, जिथे ७% मतदारवाढ झाली. उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले, तिथेही ७% वाढ झाली. पुण्यात वडगावशेरीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे बापूसाहेब पठारे विजयी झाले, जिथे १०% मतदार वाढले. मालाड पश्चिममध्ये काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले (११% वाढ), तर मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड (शरदचंद्र पवार गट) विजयी झाले, जिथे ९% मतदारवाढ झाली.

भाजपचे यश म्हणजे घोटाळा, काँग्रेसचा विजय म्हणजे लोकशाही?

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करत आ. जोशी म्हणाले, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं, तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळ्याची चर्चा होत नाही. पण भाजप जिंकल्यास लगेच लोकशाही धोक्यात असल्याच्या बाता सुरू होतात.

मतदार नोंदणी मोहीम, जनजागृती आणि सरकारच्या कामगिरीचा परिणाम

लोकसभा निवडणुकीत जागा कमी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुथ बळकटीकरणावर भर दिला. मतदार नोंदणी मोहिमा, जनजागृती अभियान राबवण्यात आले. शिवाय, लोकसभा निवडणूक उन्हाळ्यात पार पडली, तर विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये झाली, त्यामुळे मतदानाच्या आकड्यात फरक पडणे साहजिक असल्याचे आ. जोशी यांनी सांगितले.

राज्यभरात सुरू असलेल्या विविध योजना जसे की, लाडकी बहीण, जनधन खाते, मेट्रो व बुलेट ट्रेन, नळगंगा-वैनगंगा, नदीजोड प्रकल्प आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या निलवंडे धरणासारखी विकासकामे, यामुळे मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला, असेही त्यांनी नमूद केले.

अपयश झाकण्यासाठी खोटे आरोप

राहुल गांधी व काँग्रेस दरवेळी आपले अपयश झाकण्यासाठी खोट्या आरोळ्या उठवतात. जनतेचा विश्वास संपादन करण्याऐवजी खोटा प्रचार करण्याची काँग्रेसची सवय झाली आहे, अशी टीका करत आमदार संदीप जोशी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांची पोलखोल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *