■ ‘महाज्योती’च्या विद्यावेतनाने दिलं बळ
नागपुर समाचार : “संकटं येतात, पण जिद्द असेल तर यश नक्की मिळतं!” हे विधान सार्थ ठरवलं आहे नागपूरच्या भाग्यश्री राजेश नयकाळे हिने. संघ लोकसेवा आयोग (यूपीएसएसी) 2024 च्या परीक्षेत भाग्यश्रीने 737वा क्रमांक मिळवत संपूर्ण ओबीसी समाजाचं आणि विशेषतः महाज्योती संस्थेचं नाव उज्वल केलं आहे. कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता, केवळ स्व-अभ्यास (सेल्फ स्टडी) करून तिने हे यश मिळवलं आहे. तिच्या या संघर्षमय प्रवासात ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)’ ने दिलेलं विद्यावेतन व आर्थिक पाठबळ ही महत्त्वाची भूमिका बजावली. अशी माहिती महाज्योतीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
श्री. प्रशांत वावगे यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असतं की आपण सरकारी नोकरी करावी. त्यासाठी राज्यातील लाखों विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) सह अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली संस्था महाज्योती ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. नुकत्याच संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) द्वारे 2024 वर्षात घेण्यात आलेल्या ओबीसी प्रवर्गातील निकालात महाज्योतीच्या 28 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. भाग्यश्रीचे वडील हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना, महागडे कोचिंग क्लासेस घेणं शक्य नव्हतं. मात्र तिच्या अभ्यासाची जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवरचा विश्वास यामुळे तिने ही लढाई जिंकली. महाज्योती संस्थेने दिलेल्या विद्यावेतन आणि प्रेरणेच्या बळावर तिने अभ्यास सुरू ठेवला. परीक्षेच्या तयारीसाठी कोणतीही कोचिंग क्लासेस न लावता, केवळ महाज्योतीच्या मार्गदर्शनात आणि स्वतःच्या मेहनतीवर तिने देशात आपले स्थान मिळवल्याचेही श्री. प्रशांत वावगे म्हणाले. यंदाच्या यूपीएएसी परीक्षेत राज्यातील 16 जिल्ह्यांतील 28 ओबीसी विद्यार्थ्यांनी यश मिळवलं असून, त्यांना महाज्योतीकडून उत्तम प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देण्यात आले.
विशेषतः भाग्यश्री सारख्या विद्यार्थिनींनी कोणतीही सुविधा नसतानाही अपार कष्टातून हे यश मिळवणं हे खरं प्रेरणादायी आहे. “फक्त सोयी असून उपयोग नाही, जिद्द आणि दिशा हवी!” हेच तिने दाखवून दिलं. भाग्यश्रीने यूपीएससीमध्ये 737वी रैंक प्राप्त केली आहे. ओबीसी प्रवर्गातून असल्याने आयपीएस किंवा आयआरएस मिळेल असा विश्वास श्री. प्रशांत वावगे यांनी व्यक्त केले.
शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन’ : मंत्री अतुल सावे
शिक्षणाचे महत्व अबाधित आहे. शिक्षणामुळेच आपले स्वप्नांची दारे उघडण्याची किल्ली मिळते आणि याच शिक्षणाच्या बळावर यशस्वी करिअर घडविण्याचा मार्ग मोकळा होतो. हीच संधी विद्यार्थ्यांना शासन सेवेत मिळावी यासाठी ‘महाज्योती’ कटिबद्ध आहे. असा विश्वास मागास बहुजन कल्याण विभाग, तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर मा. ना. श्री. अतुल सावे मंत्री यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 50 हजार रुपये आणि मुलाखतीसाठी 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या पाठबळामुळेच यंदा 28 पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. हे यश मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचेच प्रतिबिंब आहे, असे मनोगतही मा. ना. श्री. अतुल सावे मंत्री यांनी व्यक्त केले.