- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपूरच्या ड्रीम एशिया थीम पार्कमध्ये वाहनचालकाशी गैरवर्तन; मालकाने मागितली सार्वजनिक माफी!

नागपूर समाचार : शहरातील काटोल रोड स्थित ड्रीम एशिया थीम पार्कमध्ये जेवणाच्या कूपनवरून एका वाहनचालकाशी गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी घडली आहे. या प्रकरणात पार्क प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, चौफेर टीकेनंतर पार्कचे मालक पंकज ठाकरे आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पार्कच्या कर्मचाऱ्यांकडून संबंधित वाहनचालकाशी अपमानास्पद आणि अवमानकारक वर्तन करण्यात आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या, अनेकांनी पार्कच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.पार्कच्या व्यवस्थापनाने नंतर पत्रकार परिषद घेऊन संबंधित चालकाची माफी मागितली व भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

जवाबदारीची जाणीव की दबावाखाली माफी?

या माफीनंतर जनतेकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी याला सकारात्मक पाऊल मानले असले तरी काहींनी यामागील हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून माफी मागण्यात आली का, की खरोखरच चूक कबूल करण्यात आली?” असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांची मागणी, सखोल चौकशी आवश्यक

हा प्रकार केवळ माफीवर थांबता कामा नये, तर या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे इतर कामगारांनाही सन्मानाने वागणूक मिळावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, असे मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *