नागपूर समाचार : नागपूरमध्ये वायुसेना नगर इथे 23 व 24 एप्रिल 2025 रोजी मेन्टेनन्स कमांडच्या कमांडर्सची परिषद पार पडली. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग 24 एप्रिल 2025 रोजी प्रत्यक्ष आणि दूरस्थ उपस्थितीत झालेल्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. मेन्टेनन्स कमांडचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी त्यांचे स्वागत केले.
भारतीय हवाई दलाच्या देखभाल दुरुस्ती क्षमतेत वाढ व कार्यकारी क्षमता सर्वाधिक करणे या संकल्पनेवर आधारित या परिषदेत आत्मनिर्भरतेत वाढ, स्वदेशी उत्पादन आणि महत्त्वाच्या मालमत्तेची दीर्घकालिन शाश्वतता या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
मूळ परदेशी उत्पादकांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने मेन्टेनन्स कमांडने सुरू केलेले उपक्रम, यंत्रणेची विश्वासार्हता वृद्धिंगत करणे, आयुर्मर्यादा वाढविण्याचा अभ्यास व नवकल्पना यांची माहिती हवाईदल प्रमुखांना या परिषदेत देण्यात आली. मेन्टेनन्स कमांडच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय हवाई दलाच्या सुसज्जतेसाठी दिलेले उल्लेखनीय योगदान आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी सुसंगत काम याची त्यांनी प्रशंसा केली.
सर्वसमावेशक विकास व परिवर्तनकारी सुधारणा यावर भर देत हवाई दल प्रमुखांनी मेन्टेनन्स कमांडअंतर्गत येणाऱ्या युनिट कमांडर्सना स्वतः पुढाकार घेऊन मूळ परदेशी उत्पादकांवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी व भारतीय हवाई दलाचे कार्यकारी सामर्थ्य सर्वाधिक करण्याची देशांतर्गत क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले.
आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मेन्टेनन्स कमांड युनिटना मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख कमांडर एअर मार्शल गर्ग यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आले.