- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपुर समाचार : एनएफएससी आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्यात सामंजस्य करार

 * जंगलातील वणवा व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रयत्न

नागपूर समाचार : जंगलातील वणवा प्रतिबंधक आणि व्यवस्थापन धोरणांच्‍या आखणीच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी, चंद्रपूर (सीएफए) यांच्‍यात सोमवारी सामंजस्य करार (एमओयू) झाला.

एनएफएससीचे संचालक एन.बी. शिंगणे आणि सीएफएचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी नागपूरचे उपवनसंरक्षक (एफआर) उमेश वर्मा, एनएफएससीच्‍या समन्वयक आणि सहाय्यक संचालक वैशाली सिंग, सहाय्यक संचालक गगन उपाध्याय आणि सहाय्यक संचालक धर्मेंद्र पाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या सामजंस्‍य कराराचा प्रमुख उद्देश जंगलातील वणवा प्रतिबंधन, व्यवस्थापन आणि प्रतिसाद या महत्त्वाच्या क्षेत्रात प्रशिक्षण, कौशल्याची देवाणघेवाण आणि संशोधन कार्यक्रमांना बळकटी देणे आहे, असे एन. बी. शिंगणे यांनी सांगितले.

या करारामुळे वणवा नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रे आणि सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करून संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्प सुलभ करण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही संस्थांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता वाढेल, ज्यामुळे वनसंपत्ती आणि जैवविविधतेचे चांगले संरक्षण होईल अशी अपेक्षा आहे, असे श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *