- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : कलाकारांनी लोकाभिमूख दृष्टीकोन ठेवून कार्य करावे – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

■ ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर समाचार : आपल्या देशाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या कलेचा विकास करण्यासाठी कलाकारांनी लोकाभिमूख दृष्टिकोन ठेवून उत्तम कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. १० जानेवारी) येथे केले.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी विभागाच्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२४-२५ चे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कला संचालनालयाचे संचालक डॉ. संतोष क्षीरसागर,उपसंचालक विनोद दांडगे, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपुरचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कला ही जात, धर्म, पंथ असा भेद न मानता समाजातील सशक्त सांस्कृतिक वारसा पुढे नेत असते. कला सतत विकसित होत असते. कलाकारांनी लोकाभिमुख दृष्टिकोनातून उत्तमोत्तम कार्य करून कलेचा हा वारसा पुढे घेऊन जावा. समाजातील उत्तम प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अनेक संस्था करत असतात. अशा संस्थांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. 

कलाकारांना संधी व प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने १९५६ पासून राज्य कला प्रदर्शन आयोजनाद्वारे कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामाध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळते. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले. 

नागपूरनेही अनेक दिग्गज कलावंत, साहित्यिक सांस्कृतिक विश्वाला दिले. नाट्य, संगीत, चित्रकला, साहित्य आदी क्षेत्रांमधील प्रतिभावान मंडळींनी नागपूरचा गौरव वाढवला आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूरचे माजी प्राध्यापक नंदकिशोर मानकर यांचा यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सात कला प्रकारांत ३१ कलाकृतींना पारितोषिक व ३४ कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनाही प्रोत्साहनार्थ विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *