- Breaking News, Meeting, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : वाहकांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे ‘आपली बस’ची प्रतिमा उंचावेल

■ मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा विश्वास :‘आपली बस’ वाहकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

नागपूर समाचार : ‘आपली बस’ सेवेमध्ये वाहकांची भूमीका अत्यंत महत्वपूर्ण आहे. वाहकांचा थेट संबंध प्रवाश्यांशी येतो. अशावेळी वाहकांची चांगली वर्तणूक आणि प्रवाश्यांशी सुसंवाद यामुळे वाहतूक सेवा चांगली होऊ शकते. महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामुळे वाहकांच्या कामात बरीच सुधारणा होईल आणि वाहकाच्या चांगल्या कामामुळे ‘आपली बस’ची प्रतिमा उंचावेल, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहामध्ये मनपा परिवहन विभागाद्वारे चलो मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून दहा दिवसीय आपली बस सेवा वाहक प्रशिक्षणाचे गुरुवारी (ता.२) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरूडे, यांत्रिकी अभियंता श्री. योगेश लुंगे, लेखा अधिकारी श्री. विनय भारद्वाज, सहायक समीर परमार, ऑपरेशन मॅनेजर राजीव घाटोळे, ‘चलो’चे टीम लिडर नीतेश पटेल, ऑपरेशन मॅनेजर मन यादव, सचिन गाडबैल आदी उपस्थित होते.

मनपाच्या ’आपली बस’ सेवेमध्ये सुसूत्रता आणणे, प्रवासी संख्या वाढविणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अशा विविध उद्दिष्टांच्या अनुषंगाने ‘आपली बस’ सेवेतील सर्व चालक वाहकांचे टप्पेनिहाय प्रशिक्षण २ ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ४ अशा दोन सत्रांमध्ये प्रत्येकी ५० वाहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, येत्या काळात महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वाढविण्यावर भर आहे. यापुढे ऑनलाईन तिकीट, यूपीआय पेमेंट पद्धतीचा अवलंब ‘आपली बस’ सेवेमध्ये करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. ‘आपली बस’ सेवेतील सर्व प्रकारच्या बसेसची माहिती वाहकांना असणे आवश्यक असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाहकाने नियमित गणवेश वापरणे, प्रवासांशी कसे बोलले पाहिजे, विनातिकीट प्रवास होऊ नये अशा विविध बाबींकरिता हे प्रशिक्षण अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व गोष्टी शिकून घ्याव्यात व त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनात करून घ्यावी, असेही डॉ. अभिजित चौधरी यावेळी म्हणाले. वाहकांकरिता प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल त्यांनी परिवहन विभागाचे अभिनंदन केले. या प्रशिक्षणामुळे वाहकांच्या कामात चांगली सुधारणा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या की,’आपली बस’ सेवेतील वाहकांना प्रशिक्षण देणे ही अत्यंत चांगली बाब आहे. परिवहन विभागाचा तोटा कमी करण्याचा मनपाचा मानस आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे आपल्या कामाला न्याय दिल्यास या समस्यांवरही मात करता येईल, असे त्या म्हणाल्या. ’आपली बस’ चालविताना ज्या समस्या येतात त्या सोडविणे आणि ज्या सुधारणा करणे गरजेचे आहे, त्या बाबतीत सर्व प्रशिक्षण वाहकांना दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पेमेंटवर भर दिला जाणार असून पुढे होणाऱ्या नव्या बदलासाठी सर्वांनी तयार असावे, असेही आवाहन श्रीमती आंचल गोयल यांनी केले.

प्रास्ताविकमध्ये परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव यांनी प्रशिक्षणाची पार्श्वभूमी विषद केली. त्यांनी सांगितले की, १० दिवसांचे या प्रशिक्षणामध्ये प्रति दोन बॅच नुसार प्रत्येकी ५० वाहकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात वाहकांचे कार्य आणि जबाबदारी सांगितले जाईल. शिवाय प्रशिक्षणात आपली बस आगार, बस मार्ग, बस प्रकार व वाहकाचे वर्तन इतर माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यांच्याकडून फिडबॅक प्रमाणपत्र भरवून घेतले जाणार आहे. चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्यांमधून चांगले प्रशिक्षक निवडले जातील आणि त्यांना पुढे ‘मास्टर ट्रेनर’ केले जाईल. शिवाय प्रत्येक वाहकांची प्रोफाईल तयार करण्यात येणार आहे. त्यांची उपस्थिती, कामाची माहिती चांगले काम याची सर्व माहिती या प्रोफाईलमध्ये असणार आहे, असेही श्री. विनोद जाधव यांनी सांगितले.

प्रशिक्षणाच्या सुरूवातीला ‘चलो’चे ऑपरेशन मॅनेजर मन यादव, डेपो मॅनेजर अभिजीत देवतळे व हेमंत चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे वाहकांना आवश्यक माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *