- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : जिल्ह्यात २२२ गावांमधील ३,२४० महिला बचत गटांच्या माध्यमातून सुमारे ३८ हजार महिला संघटित

माविमच्या सूक्ष्म पतपुरवठा संमेलनातून पुढे आली माहिती

नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यातील २२२ गावांमध्ये ३,२४० महिला बचत गटांच्या माध्यमातून ३७,८५० महिलांना संघटित करण्यात आल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सूक्ष्म पतपुरवठा संमेलनातून पुढे आली.

लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत कार्यरत एकूण ३,२३४ महिला बचत गटांपैकी २,४२३ बचत गटांवर सध्या कर्ज आहे. यापैकी १,६५९ बचत गट सन २०२६-२७ मध्ये नव्याने कर्ज घेण्यासाठी पात्र ठरले आहेत, अशी माहितीही महामंडळाचे वरीष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी संमेलनात दिली. 

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) नागपूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) अंतर्गत कार्यरत महिला स्वयंसाहाय्य बचत गटांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सूक्ष्म पतपुरवठा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक (जिल्हा विकास) सचिन सोनोने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य झोनल प्रबंधक बी. बी. बेहरा उपस्थित होते.  

दारिद्र्यरेषेखालील, गरीब, गरजू, वंचित आणि परित्यक्ता महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना संघटित करण्याचे काम माविम करत आहे. तसेच महिलांना त्यांचे अधिकार व हक्क यांची जाणीव करून देणे, त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लोकसंचालित साधन केंद्रांसारख्या लोकसंस्थांची उभारणी व बळकटीकरणासाठी मार्गदर्शन करणे यावरही भर दिला जात आहे. महिलांना गरजेनुसार बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणे, त्या कर्जाच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण देणे आणि महिलांसाठी शाश्वत उपजीविकेची साधने निर्माण करणे यासाठी माविम सातत्याने कार्यरत आहे.

या संमेलनात महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँक कर्जपुरवठा, उद्योगविकास आणि उपजीविका वृद्धी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. निवडक अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक, अन्य बँकर्स, महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी यावेळी आपले विचार मांडले. याप्रसंगी माविमचे नागपूर विभागाचे विभागीय सल्लागार राजू इंगळे यांनी माविम, मुंबईचा अहवाल सादर केला. तर माविम, नागपूरचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार अमित गाढे यांनी उपप्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर माविम, नागपूरचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी सन २०२६-२७ साठी नवतेजस्विनी व अल्पसंख्याक घटकांकरिता तयार करण्यात आलेल्या बँकनिहाय पतयोजनेचा तपशील सादर केला. या योजनेअंतर्गत एकूण १,६५९ बचत गटांसाठी ९९.२३ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

सन २०२५-२६ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकसंचालित साधन केंद्रांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये नागपूर येथील फैजाने ताज लोकसंचालित साधन केंद्राने प्रथम क्रमांक, नागपूर ग्रामीण येथील आस्था लोकसंचालित साधन केंद्राने द्वितीय क्रमांक, तर हिंगणा येथील स्त्रीशक्ती लोकसंचालित साधन केंद्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या केंद्रांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. माविमच्या नागपूर विभागाचे विभागीय सल्लागार राजू इंगळे, माविम, नागपूरचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार अमित गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत फुलझेले, एचडीएफसी बँकेचे विभागीय व्यवस्थापक आशीष सहारे, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, युको बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक भूविड मुळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ व्यवस्थापक अतुल डहाके, आयडीबीआय बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक मनीष अदाणी, युनियन बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक आशीष गोंडाणे, सेल्कोचे नागपूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक तुषार गायकवाड, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक तुषार सोरते, पंजाब नॅशनल बँकेचे जिल्हा समन्वयक अंकुश महाक्षेत्री, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक सचिन गोडसे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक सुमित वानखेडे, एचडीएफसी बँकेचे जिल्हा समन्वयक मनोज कोचे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती प्रियंका कपले, महाराष्ट्र ग्रामीण विकास बँकेचे अमोल आसोले, मत्स्यव्यवसाय विभागाच्या विभागीय उपव्यवस्थापक श्रीमती अश्विनी टेकाम, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक गजानन सानप, लिडकॉमचे उपव्यवस्थापक सुरेश ढगे, इतर मागासवर्ग महामंडळाचे सुहास बेझलवार, जिल्हा उद्योग केंद्र, नागपूरच्या उषा काळे तसेच विविध महामंडळांचे अधिकारी व व्यवस्थापक उपस्थित होते. याशिवाय सर्व लोकसंचालित साधन केंद्रांचे अध्यक्ष, व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहयोगिनी तसेच माविमचा जिल्हास्तरीय कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.