

नागपूर समाचार : भारतीय टपाल विभाग आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद नागपूरच्या “प्रोजेक्ट DREAM – Dedicated Reading Rooms for Empowerment, Awareness & Motivation” या उपक्रमावर आधारित विशेष वाहतूक कव्हर प्रकाशित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये वाचन, अध्ययन, जागरूकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शंकर नगर टपाल कार्यालय, नागपूर येथे झाली. यावेळी श्री अतुल काळे, सहाय्यक संचालक डाक सेवा (ADPS-III), नागपूर विभाग यांनी विशेष कव्हर्स कु. प्राची वाघमारे, महिला पोस्टमन यांच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्द केले. यासोबतच या विशेष वाहतुकीचा शुभारंभ करण्यात आला.
यानंतर ही विशेष कव्हर्स जिल्हा परिषद नागपूरच्या खास तयार करण्यात आलेल्या “ज्ञानरथ” मधून वाहून नेण्यात आली. ज्ञानाचा प्रसार आणि शैक्षणिक जागरूकतेचा संदेश देणारा हा ज्ञानरथ शंकर नगर टपाल कार्यालय येथून जिल्हा परिषद नागपूर कार्यालयापर्यंत गेला. तेथे ही कव्हर्स श्री विनायक महामुनी, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.
या विशेष वाहतूक कव्हरचे औपचारिक प्रकाशन श्री विनायक महामुनी, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री निखिल भुयार, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक); श्री निलेश गुंड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक); डॉ. कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी; श्री कपिल काळोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर; श्री कैलास घोडे; वेदांत पाठक, मुख्यमंत्री फेलो, नागपूर; श्री सुजितकुमार लांडगे, वरिष्ठ पोस्टमास्तर, नागपूर जीपीओ, तसेच जिल्हा परिषद नागपूर आणि भारतीय टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम नागपूरसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे. जिल्हा परिषद आणि भारतीय टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कव्हर प्रकाशित करून ते ज्ञानावर आधारित विशेष वाहनातून वाहून नेण्याचा हा नागपूरमधील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला उपक्रम आहे. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये हा देशातील मोजक्या आणि अभिनव सहकार्यांपैकी एक मानला जात आहे.
ज्ञानरथातून वाहून नेण्यात आलेले हे विशेष वाहतूक कव्हर फिलाटेलिस्ट, टपालप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये विशेष आकर्षण ठरणार असून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाला फिलाटेलिस्ट, टपालप्रेमी, अधिकारीवर्ग आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. त्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.





