- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : स्व. गोविंदराव मोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवारी राजा शिवछत्रपती महानाट्य

समाजसेवी संस्थेला समर्पण पुरस्काराने गौरविणार

नागपूर समाचार : श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. गोविंदराव मोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपूरकरांसाठी एका भव्य सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. निश्चयपूर्तीचा महामेरू मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवछत्रपती हे महानाट्य रविवार, २२ फेब्रुवारीला हुडकेश्वर रोडवरील एनआयटी ग्राऊंड (तारा ग्राऊंड) येते सादर होणार आहे.

सायंकाळी ६ वाजता महानाट्याचा प्रयोग सुरू होईल. यामध्ये शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, अंगावर रोमांच उभे करणारे प्रसंग आणि भव्य सेटचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. स्व. गोविंदराव मोंढे यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचवण्यासाठी श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था केवळ सहकार क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सदैव अग्रेसर राहिली आहे. संस्थेचे संस्थापक, आदरणीय स्व. गोविंदरावजी मोंढे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच परंपरेचे औचित्य साधून, समाजात निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ‘समर्पण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा देखील महानाट्याच्या प्रयोगापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा होईल. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक अनुभवाचा लाभघ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील मोंढे यांनी केले आहे.